anna bhau sathe

अण्णा भाऊ साठे

anna bhau sathe  अण्णा भाऊ साठे
  • जन्मनाव :- तुकाराम भाऊराव साठे
  • टोपण नाव :- अण्णा भाऊ साठे / लोकशाहीर
  • जन्मस्थळ :- वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली
  • जन्मतारीख :- १ ऑगस्ट १९२०
  • मृत्यू :- १८ जुलै १९६९
  • वडील :- :- भाऊराव साठे
  • आई:- :- वालुबाई साठे
  • पत्नी :- कोंडाबाई साठे जयवंता साठे
  • अपत्ये :- मधुकर, शांता आणि शकुंतला
  • धर्म :- हिंदू
  • शिक्षण :- अशिक्षित
  • कार्यक्षेत्र :- लेखक, साहित्यिक
  • भाषा :- मराठी
  • प्रभाव :- बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे, कार्ल मार्क्स
  • प्रसिद्ध साहित्यकृती :- फकिरा
  • चळवळ :- संयुक्त महाराष्ट्र चळवळ
  • साहित्य प्रकार :- शाहिर, कथा, कादंबरीकार
  • राष्ट्रीयत्व :- भारतीय
  • नागरिकत्व :- भारतीय

अण्णाभाऊ साठे…. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर असे पानं. आपल्या लेखणीला तोफ बनवून तिच्यातून क्रांतीचे तोफगोळे फेकणारे साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ. आपल्या डफावर परिवर्तनाची थाप देऊन जनमाणसं विद्रोहाने पेटवणारे शाहिर म्हणजे अण्णाभाऊ.

तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० – जुलै १८, इ.स. १९६९) हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला ‘लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले . अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्‍न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. अण्णा भाऊ साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते. अण्णा भाऊ साठे म्हणजे जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते.


लेखन:-
अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्‍या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहिले.
बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.


बालपण
वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोक कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर. शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासा पासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जातीवर ब्रिटिशांनी गुन्हेगार जात म्हणून शिक्का मारलेला असल्याने त्यांचं बालपणीचं जीवन हे काही प्रमाणात भटक्या अवस्थेत गेलं. त्या काळातील कुरुंदवाड संस्थानातील १ ऑगस्ट १९२० वाटेगाव ता. वाळवा जि सांगली येथे त्यांचा जन्म झाला. वर्चस्व आणि श्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून हिंदू धर्माने काही जातींना गावाच्या बाहेर ठेवले होते. अशाच वस्तीतील एका छपरात अण्णांचा जन्म झाला.

अण्णाची आई वालुबाई भाऊराव साठे आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे पोटा – पाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णाभाऊंवर होती. अण्णांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे हे माळी आणि उत्तम शेतीतज्ञ होते. परिसरात कुठे ही दरोडा पडला किंवा चोरी झाली की पोलिस लगचे अन्नाभाऊच्या वस्तीत येऊन लोकांची धर पकड करायचे. अशा वेळी घरातील पुरुष – बायका दिवस दिवस डोंगरात जाऊन लपायचे. खालच्या जातीतील म्हणून गावात कुणाला शिवायचे नाही, हातात हात मिळवायचा नाही, हे अण्णांनी लहानपणीच पाहिले. अनुभवले. अगदी वर्गातही त्या काळी प्रत्येक जातीची मुले वेगवेगळी बसत. त्यामुळे अण्णांनी एक दिवस वडिलांना विचारले – “तुमच्या मुबईत जातीची शिवाशिव आहे का?” वडील म्हणाले, “व्हय. चहाच्या हॉटेल मालकांनी फुटक्‍या कप – बशा बाहेर ठीवल्या आहेत. त्यातच आपल्या जातीची माणसं बाहेर बसून च्या पेत्यात. तसं बघाय गेलं तर आम्हाला कोनीच वळखत न्हाय, पन ह्यो जुना रिवाज हाय म्हनून आम्ही आपलं बाईर बसून पेतो. उगीच कोनाची खटखट नको म्हनून. इंग्रज सायेबाकडं ही शिवाशिव नसती. मी त्यांच्याकडे माळी काम करायला गेलो म्हंजी ते मला तेंच्याच कपात च्या देत्यात. तेंच्याकडे एकच माणसाची जात. आमची माणसं नस्ती आडगी. म्हनूनच इंग्रज आमच्यावर राज्य करत्याती. अन्‌ आमी एका देशाचं असून आम्ही एकमेकाला शिवून घेत न्हाय.”

वडील भाऊराव मुंबईत माळी काम करून गावाकडे असणाऱ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत. मुंबईत राहत असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजले होते. त्यामुळे आपल्या मुलांनी शिकावे, असे त्यांना वाटे. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. गावाकडे आल्यावर एके दिवशी त्यांनी अण्णाला शाळेत घातले. त्या वेळी त्यांचे वय थोडे जास्तच होते. शाळेत गेल्यावर दुसऱ्याच दिवशी गुरुजी त्याच्यावर संतापले. ते म्हणाले, कालपासून ही चारच अक्षरे तू गिरवतो आहेस, तरी तुला ती नीट लिहिता येत नाहीत. त्यावर अण्णांनी त्यांना आपण कालच शाळेत आलो असल्याचे आणि मन लावून शिकणार असल्याचे सांगितले. पण गुरुजींनी त्याला मारायचे ठरवले होते. घोड्या एवढा झाला आहेस आणि अक्षर काढता येत नाही, असे म्हणत मास्तरांनी अण्णांची उजव्या हातची बोटे सुजेपर्यंत मारले. दुसऱ्या दिवशी अण्णांनी वर्गात येऊन गुरुजींच्या अंगावर मोठा धोंडा टाकला. त्यामुळे गुरुजी कोलमडले आणि विद्यार्थ्यांना सांगू लागले, पकडा त्या तुक्‍याला. पण तोपर्यंत अण्णा घरी पोचले होते. दुसऱ्या दिवशी मास्तरांनी गावातील पंतांकडे तक्रार केली.

पंतांनी अण्णा आणि त्यांच्या वडिलांना बोलवून घेतले. बरोबर अण्णांचे मामा फकिरा हे देखील आले होते. पंतांनी अण्णांची सुजलेली बोटे पाहिली. ते म्हणाले – “गुरुजी, तुम्हाला मुलं आहेत की नाही? गरिबाच्या पोराला तुम्ही एवढे मारले. स्वत:च्या पोराला एवढे मारले असते का? अण्णांचे मामा फकिरा म्हणाले – “जर तुम्ही गावातील दुसऱ्या कोणत्या पोराला एवढे मारले असते तर तुम्हाला गावातून पळून जावे लागले असते.” गुरुजी त्यावर काही बोलले नाहीत. तेव्हा फकिरा त्यांना म्हणाले – “गुरुजी इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं म्हणून तुम्ही ठरवू नका. पोराला नीट शिकवा. नायतर भलतंच व्हईल. “गुरुजी गरिबांच्या मुलांना दूर लोटू नका. उद्या शिकून ह्याच तुक्‍याचा तुकाराम होईल आणि विमानातून इंग्लंड अमेरिकेला जाईल. तो शिकला पाहिजे.” परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. अण्णाभाऊ पहिल्यांदा वाटे गावच्या शाळेची पायरी चढले; पण शिक्षकांच्या निर्दयी मारामुळे दोन दिवसांतच त्यांनी शाळेचा धसका घेऊन शाळेकडे कायमचीच पाठ फिरवली. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.

लहानपणापासूनच अण्णाना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. अण्णाभाऊंच्या बालपणातल्या घडणी मध्ये त्यांच्या मूलभूत आवडींचा वाटा जास्त आहे. गर्दीपासून दूर असे डोंगर, दर्या, राने, नद्या या ठिकाणी भटकणं त्यांना आवडे. त्यातूनच पक्षिनिरीक्षण, शिकार करणं, मध गोळा करणं हे छंद त्यांना जडले. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पाना – फुलां मधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. जत्रांमध्ये जाऊन तिथल्या गोष्टींचं निरीक्षण करणंही त्यांच्या आवडीचं एक काम होतं. त्यात नंतर हळूहळू पाठांतराची भर पडत गेली. लोकगीतं, पोवाडे, लावण्या पाठ करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकणं आणि इतरांना सांगणं या त्यांच्या छंदातून त्यांच्या भोवती समवयीन मुलांचा गोतावळा जमत असे. शिवाय मैदानी खेळांचा वारसा मिळाल्यामुळे दांडपट्टा चालवण्यातही ते प्रवीण होते. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्या भोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत.

lokshahir annabhau sathe jaynti

कार्य:-
अण्णा भाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी तमाशा या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले. असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड(लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल.

अण्णाभाऊचे साहित्य –
अण्णाभाऊंच्या साहित्यात ग्रामीण, दलित, महिला या समाजातल्या शोषित वर्गांचं अनुभवाधिष्ठित चित्रण आढळतं. ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकर यांचा प्रभाव असणाऱ्या मराठी कादंबरीच्या त्या काळात जेव्हा शहरी आणि उच्च वर्गीयांचंच प्रतिनिधित्व होत होतं, तेव्हा अण्णाभाऊंनी कनिष्ठ आणि ग्रामीण जनतेचं विश्व साहित्यात आणलं. साहस या गुणाचं चित्रण त्यांच्या अनेक कादंबऱ्यांतून आढळतं. ‘फकिरा’ या त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरीत त्यांनी आपले खऱ्या आयुष्यातले मामा फकिरा राणोजी मांग यांची साहसी जीवन कथा मांडलेली आहे, फकीरा ही पुढे अतिशय गाजलेली कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. तर ‘वारणेच्या खोऱ्यात’ या कादंबरीत स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करणारा तरुण आणि त्याच्या प्रेयसीची कथा आहे.

‘कार्यकर्ते लेखक’ असं अण्णाभाऊंना म्हटलं गेलं, कारण आपल्या साहित्याला त्यांनी सामाजिक चळवळींशी जोडलं. सामान्य कष्टकरी लोकांशी असलेली त्यांची बांधिलकी त्यांच्या साहित्यातून आणि कार्यातून दिसते. त्यांनी ‘वैजयंता’ या स्वतःच्या कादंबरीच्या प्रस्तावनेत आपली लेखनभूमिका अण्णाभाऊनी विषद केली आहे, ती अशी – “जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर आणि तीच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध नि सभ्य व्हावा, इथे समानता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पहात पहात मी लिहीत असतो. केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते. ते सत्य ह्रदयानं मिळवावे लागते. डोळ्यांनी सर्वच दिसते. परंतु ते सर्व साहित्यिकाला हात देत नाही. उलट दगा मात्र देते. माझा असा दावा आहे, की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलीतांच्या, शोषितांच्या, कामगारांच्या तळहातावर तरली आहे. त्या शोषितांचे जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूने नि निष्ठेने मी चित्रित करणार आहे नी करीत आहे.”

अण्णांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्‍या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथा संग्रह ही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॉलीनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वग नाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर अण्णांनी `बंगालची हाक’ हा पोवाडा रचला. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली..

fakira annabhau sathe book krushna kathachya katha book swapn sundri bookkhulnvadi book annabhau sathe

कादंबरी वरून निघालेले चित्रपट – १) वैजयंता :
या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘वैजयंता‘
साल १९६१, कंपनी – रेखा फिल्म्स

२) आवडी :
या कादंबरी वरून ‘टिळा लावते मी रक्ताचा’
साल १९६९,  कंपनी – चित्र ज्योत

३) माकडीचा माळ :
या कादंबरी वरून  ‘डोंगरची मेना’
साल १९६९,  कंपनी – विलास चित्र

४) चिखलातील कमळ :
या कादंबरी वरून ‘मुरली मल्हारी रायाची’
साल १९६९, कंपनी – रसिक चित्र

५) वारणेचा वाघ :
या कादंबरी वरून ‘वारणेचा वाघ’
साल १९७०, कंपनी –  नवदिप चित्र

६) अलगूज :
या कादंबरी वरून ‘अशी ही साताऱ्यांची तऱ्हा’
साल १९७४, कंपनी – श्रीपाद चित्र

७) फकिरा :
या कादंबरी वरून ‘फकिरा’
कंपनी – चित्र निकेतन

पुरोगामित्वाची परंपरा : शिवराय वंदन – अण्णाभाऊ हे आपल्या कार्यक्रमाची सुरवात एखाद्या देवाचे नाव न घेता छत्रपती शिवरायांच्या नावाने करायचे… तमाशात पारंपारिक श्रीगणेशा.. अण्णांनी तमाशाला नवे रुप दिलं. पहिल्या नमनात मातृभूमी हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा समावेश झाला, गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. लावणी व तमाशा लोक शिक्षणाकडे वळविण्याचे श्रेय अण्णाभाऊं कडेच जाते. गवळण झिडकारून ‘मातृभूमिसह’ ‘शिवरायांना वंदन’ करण्याची परंपरा अण्णाभाऊनी रुजवली ती अशी –

“प्रथम मायभूमीच्या चरणा ।
छत्रपती शिवाजी चरणा ।
स्मरोनी गातो कवणा ।।”

अण्णाभाऊंनी आपल्या पुरोगामी – समतावादी, वैज्ञानिक विचारांनी पारंपरिक, पौराणिक तमाशाच्या गण – गवळण ढाच्यात ही आमूलाग्र परिवर्तन केले. तमाशाच्या प्रारंभी होणाऱ्या गणेश वंदनाला ही त्यांनी फाटा दिला आणि प्रथम वंदू भूचरणा व छत्रपती शिवाजी राजा सारख्या शूर पुरुषाला वंदन केले. थोडक्यात त्यांनी देवा ऐवजी माणसाला वंदन करण्याची नवी प्रथा पाडली. तमाशात गवळणींची जी अश्लील भाषेत टिंगल – टवाळी चालायची तिला ही त्यांनी काट दिला. अण्णाभाऊंनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी जलसा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जन प्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या लोक नाटय़ातून पुढे नेली. त्यांनी मराठी व भारतीय साहित्य – संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढर पेशी कक्षा रुदावल्या. त्यामुळे अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी,  रशियन, फ्रेंच, झेक आदी जागतिक भाषांत ही अनुवादित झाले. मराठीतील ज्येष्ठ साहित्यक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णा भाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि ‘महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की’ असा गौरव केला.

अण्णा भाऊ साठे

 संयुक्त महाराष्ट्रासाठी योगदान –
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोक नाट्ये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोक नाट्याचे रूप दिले.

२ मार्च १९५८ मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. २ मार्च १९५८ उदघाटन पर भाषणातील काही अंश –

“माणूस जगतो का? नि जगण्यासाठी एवढा धडपडतो का? याचा विचार आम्ही करणे जरूर आहे. त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भित्रा समजतो, तो उंच गगनात गेलेल्या विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून विजेच्या तारा जोडतो, खाणीत उभ्या कड्यावर चढून सुरुंगाना पेट देतो किंवा पोलादाच्या रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि या सर्व ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाहत असतो. कधी कधी त्याची व मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करीत करीत मरण पत्करतो. ही जगण्याची नि मारण्याची आगळी रीत आहे. ती लेखकाने समजून घ्यावी. सुरुंगाना पेट देता देता किंवा पोलादाच्या रसात बुडून मरणे, नाही तर विजेच्या धक्क्याने मरणे, दिवाळे निघाले म्हणून शेअर बाजारात मरणे या मरणातील अंतर लेखकाने मोजून पाहावे नि श्रेष्ठ मरण कोणते ते निश्चित ठरवावे.  दलितात ही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात. पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. कारण तो हाडा – मांसाचा केवळ गोळा नसतो. तो निर्मितीक्षम असतो. तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो. अशा या महान मानवा वर महाकाव्य रचणारा त्याला हवा असतो.

एका झाडा खाली तीन दगडांची चूल करून मडक्यात अन्न शिजवून दोन मुलं नि बायको यांना जागविणारा हा दलित वर वर कंगाल दिसला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हा ही पवित्र अशीच असते. कुटुंब संस्थे वरचा त्याचा विश्वास मुळीच ढळलेला नसतो. परंतु त्याची कुटुंब संस्थाच भांडवलदारी जगाने त्या झाडा खाली हाकलून दिलेली असते. त्याचे आम्ही निरीक्षण करावे, याची कारण परंपरा शोधावी आणि मग त्या कंगाल दिसणाऱ्या विषयी लिहावे. जपून लिहावे, कारण या समाजाची घडीन घडी त्या दलिताने व्यापवली आहे. अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, “हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेली आहे.” अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझरा प्रमाणे असते. ते जवळ जाऊन पाहा. मग लिहा. कारण ‘जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे’ हे तुकारामाचे म्हणणे खोटे नाही. म्हणून दलिता विषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्याच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस, हे जग तुझ्या हातावर आहे, याची जाणीव करून घ्यावी. त्याचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव आपल्या जनते बरोबर असावा लागतो. कारण जो कलावंत जनते बरोबर असतो त्याच्या बरोबर जनता असते. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्य ही पाठ फिरवीत असते. जगातील श्रेष्ठ कलावंतांनी वाङमय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे. आणि तो डोळा सदैव पुढे व जनते बरोबर असणे जरूर आहे.

रशिया प्रवास – १९४८ आणि १९६१ साली त्यांनी रशियास जाण्याचा प्रयत्न केला त्यास यश आले नाही. पण जेव्हा ते रशियाला जाणार हे नक्की झाले तेव्हा आपल्या महाराष्ट्रातून प्रचंड आर्थिक मदत झाली. वाटेगावहून मुंबईत वडिलांच्या बरोबर पायी चालत आलेला अण्णाभाऊ विश्वासाने एकटा विमान प्रवास करुन रशियाला गेले तत्पूर्वीच त्यांनी `चित्रा’ ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. अण्णा रशियात गेले.. तेथे त्यांनी ‘शिवचरित्र’ पोवाड्यातून सांगितले त्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले. `सुलतान` ही कथा लोकांना आवडली होती. तर `स्टालिन ग्राडचा पोवाडा` रशियात लोकप्रिय झाला होता. `फकिरा` कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर रशियात गेल्या नंतर त्यांचं प्रचंड स्वागत झालं.

अण्णा भाऊ साठे

रशियात अण्णांचं चांगलं स्वागत झालं. त्यावर आधारित ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवास वर्णन ही त्यांनी लिहिलं. आपल्या कार्यक्रमाची सुरवात शिवरायांच्या नावाने सुरवात करणारे आपले अण्णाभाऊ. शिव चरित्र जगभर पोहचवुन आपले सर्वस्व उपेक्षितांसाठी अर्पणारे मराठी साहित्याचे सर्वोच्च मानबिँदु “लोक शाहीर अण्णाभाऊ साठे” यांचा एक दुर्मिळ फोटो रशिया वरुन परत आल्यावर लोक शाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विमान तळाच्या बाहेर स्वागत करण्यात आले, तो क्षण. आपल्या कार्यक्रमाची सुरवात शिवरायांच्या नावाने सुरवात करणारे आपले अण्णाभाऊ. शिव चरित्र जगभर पोहचवुन आपले सर्वस्व उपेक्षितांसाठी अर्पणारे मराठी साहित्याचे सर्वोच्च मानबिँदु “लोक शाहीर अण्णाभाऊ साठे” यांचा एक दुर्मिळ फोटो रशिया वरुन परत आल्यावर लोक शाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विमान तळच्या बाहेर स्वागत करण्यात आले, तो क्षण.

अधिक वाचा

sangli jilhyatil paryatan sthal ,सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे krantisinh nana patil This image has an empty alt attribute; its file name is youtube-thumbnail-1024x576.jpg vasantdada patil

सांगली जिल्ह्याच्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल वर इन्स्टा पेजला फॉलो करा.

Whatsapp number :-
9145525222

Follow on Instagram :- https://www.instagram.com/think_sanglikar?utm_source=qr&r=nametag

Subscribe our youtube channel :- https://youtube.com/@thinksanglikar?si=Bq7o4PRmA7NX3fsq

Follow on Facebook profile :- https://www.facebook.com/ThinkSanglikarr?mibextid=ZbWKwL

Follow on facebook page :- https://www.facebook.com/thinksanglikar

You cannot copy content of this page