पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
जगातील कोणत्याही राष्ट्रात जेवढी नाट्यरूपी ग्रंथसंपदा दिसते, तेवढी ती भारतात देखील आहे. यावरून भारतीय नाट्य शाखा किती समृद्ध होती हे दिसते. त्यामुळे हिंदी आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक कोण? असा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा मिळणारे उत्तर हे ‘ सांगलीकरांची मान अभिमानाने उंचावेल ‘ असेच मिळते ते नाव म्हणजे विष्णुदास भावे.
श्रीमंतांची आज्ञा :
पेशवाईच्या असल्यानंतर थोरले श्रीमंत चिंतामणराव उर्फ आप्पासाहेब पटवर्धन हे सांगलीचे संस्थानाधिपती होते. इंग्रजांशी शेवटपर्यंत स्वाभिमानाने लढणारा पेशव्यांचा सरदार म्हणून त्यांची ख्याती होती. हा राजा फक्त शूरच नव्हता तर कलेचा चाहता देखील होता त्यांच्या पदरी असणाऱ्या सुभेदार अमृतराव भावे यांचा मुलगा विष्णू या बुद्धिमान पण उनाड मला उनाड अशा मुलातील गुण राजांनी सुरुवातीलाच ओळखून त्या १९-२० वर्षाचा मुलाला श्रीमंतांनी आपल्या नोकरीत घेतले. कथा कविता लिहिण्याचा नाद विष्णू दासांना पहिल्यापासूनच होता. १८४२ मध्ये कर्नाटकातून “भागवत” नावाची एक नाटकमंडळी सांगलीत आली होती. त्या नाटकाचे खेळ पाहिल्यानंतर ती तागडधोम पद्धतीची नाटके राजाला फारसी आवडली नाहीत. तशा प्रकारच्या नाट्यप्रयोगामध्ये काही सुधारणा करून मराठीत बनवले तर चांगले होईल. अशी कल्पना अप्पासाहेबांच्या मनात आली, आणि ते काम भावे तुम्ही करा अशी आज्ञा केली .
“सीता स्वयंवर” या नाटकाचा जन्म :
भाव्यांच्या नाटकात सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्नहर्त्या गजाननाचे स्तवन, सरस्वतीस्तवन, गजानन व सरस्वती ह्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ, अशी विष्णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती. नाटकाच्या आरंभापासून त्याची अखेर होईपर्यंत सूत्रधारास काम असे. सादर होणाऱ्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येवून आपापली भाषणे करीत. सर्वच भाषणे आधी लिहीलेली नसत. नट स्वयंस्फूर्तीनेही तेथल्या तेथे प्रसंगोचित भाषणे करीत. नृत्य-गायनाला ह्या नाटकांतून बराच वाव दिला जाई. नाटकातील प्रवेशाला ‘कचेरी’ असे नाव दिलेले होते. भावे ह्यांनी पुढे महाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली. विष्णुदास नाटकांत पखवाजाची साथ प्रमुख असे. नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल, गंभीर वा तीव्र असे बोल पखवाजावर वाजविले जात असत. ह्या पखवाजाच्या आवाजावरून ह्या नाटकांना ‘ तागडथोम नाटके ‘ असे म्हटले जाई. तसेच त्यांतील राक्षसांच्या ‘अलल् डुर्र’ अशा डरकाळीमुळे ‘ अलल् डुर्र ‘ नाटके असे त्यांना संबोधिले जात असे.
आपले मूळ कसब बाजूला ठेवून राजाची आज्ञा म्हणून अतिशय कल्पक बुद्धिवान् व हरहुन्नरी अशा विष्णू भावेनी वयाच्या २० व्या वर्षी एक अलौकिक चमत्कार घडवून दाखविला. चिंतामणरावांनी संस्थानच्या नोकरांना नाटकात कामे करण्याचे हुकूम दिले. जमिनी इनाम देतो म्हणून सांगितले. परंतु काय वाट्टेल ते झाले तरी नाटक हे झालेच पाहिजे अशा जिद्दीने हा कलाप्रेमी संस्थानिक विष्णू भाव्याच्या मागे उभा राहिला, आणि ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉल मध्ये मराठीतील पहिले नाटक `सीता स्वयंवर’ या नाटकाचा जन्म झाला. अभूतपूर्व घटना घडली.
नाट्य व्यवसायाची मुहूर्तमेढ :
नटराजाने प्रेरणा दिली आणि सांगलीच्या गणपतीने सर्व विघ्ने दूर करुन कृष्णामाईच्या पाण्याने पावन झालेल्या या भूमीत मराठी नाटकांचे बीज पेरले. या बीजाचा फळाफुलांनी बहरलेला डेरेदार वृक्ष झाला आहे. धन्य तो सांगलीचा राजा आणि धन्य तो विष्णू भावे, जो आद्यनाटककार विष्णुदास भावे म्हणून ओळखला जाऊ लागला आणि एका रात्रीत मराठी रंगभूमीचा विश्वकर्मा झाला. पुढे मराठी रंगमूमीचा प्रयोग कोठेही होवो त्या प्रयोगाच्या प्रारंभी सूत्रधार अशी प्रार्थना करीत असे की,
“हे शारदे ब्रह्मतनये !
सांगली ग्रामी विष्णुदास कवी आहेत त्यांना तुझा आशीर्वाद असावा.”
विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. विष्णुदास भाव्यांचा जन्म सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी यांच्या पोटी झाला. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता परंतु कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी ‘खेळ’ करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. त्यामुळे बाहुल्यांचा वापर करून नाटक करणे त्यांना शक्य झाले नाही.
१८५१ साली श्रीमंत चिंतामणराव वारले. त्यावेळी बाळाजीपंत माटे यांना प्रशासक म्हणून नेमले होते. विष्णुदासांनी केलेल्या नाटकांवर श्रीमंतानी केलेल्या खर्चाबद्दल सर्व मंडळींच्या नावे तसलमाती पडलेल्या होत्या. हे सर्व पैसे नाटकासाठीच खर्च झाले होते, परंतु श्रीमंतांचा हुकूम होण्याच्या आधीच श्रीमंत वारल्याने प्रशासकांनी तसलमातीचा उलगडा करण्यास सांगितले आणि कर्जे फेडण्यासाठी चार वर्षाची विष्णुदास वगैरे मंडळींना रजा दिली. या प्रशासकाचा हा तगादा मराठी रंगभूमीच्या पथ्यावर पडला. राजाश्रयाखाली असलेली मराठी रंगभूमी विष्णुदास भावे यांनी लोकाश्रयाकडे वळविली आणि पहिली व्यवसायिक मंडळी ‘सांगलीकर नाटक मंडळी’ या नावाने स्थापिली आणि नाट्य व्यवसायाची मुहूर्तमेढ या थोर कलावंताने रोविली. १८५१ सालापासून १८६२ सालापर्यंत एकूण सात दौरे केले. भाव्यांनी मुंबईला पहिला प्रयोग १४-२-१८५३ साली केला. दुपारचा प्रयोग, नाटकांचे सारांश इंग्रजीत छापून प्रेक्षकांना देणे, मुंबई टाईम्स मध्ये जहिरात आणि ग्रँट रोड थिएटर सारख्या भव्य नाट्यगृहात मराठी नाटकाचा प्रयोग अशी अभूतपूर्व कामगिरी या महर्षींनी करुन दाखविली. निव्वळ मराठी नाटकाची सुरुवात विष्णुदास भावे यांनी केली एवढेच नव्हे तर याच काळात १९५४ च्या सुमारासराजा गोपीचंद’ या हिंदी नाटकाचा प्रथम प्रयोग करुन विष्णुदासांनी हिदी रंगभूमीचे जनक म्हणून इतिहासात अलौकिक विक्रम करुन सांगलीचे नांव सर्वदूर पसरविले. त्यांची सर्व नाटके पौराणिक होती.
नाट्यसंन्यास :
नाटक मंडळीत पुढे १८६२ च्या सुमारास भांडण झाल्याबरोबर विष्णुदासांनी जवळ जवळ नाट्यसंन्यास घेतला. परंतू तत्पूर्वी सांगली दरबारचे कर्ज व तसलमातीचा उलगडा करण्यास हा महान पुरुष विसरला नाही. त्या काळामध्ये विष्णूदास भावेंना मदत करण्यास गोपाळ मनोळकर, जिवाजी पंत काकडे आणि गोविंद भट करमरकर हे सांगलीचे सुपुत्र होते. हेच तिघे पुढे सांगलीकर नाटक मंडळीचे मालक झाले. त्यानंतर श्री बळवंतराव मराठे या सांगलीच्या सुपुत्राने नूतन सांगलीकर नाटक मंडळी काढली. पुढे सांगलीकर संगीत हिंदी नाटक मंडळी निघाली. या मराठ्यांनी ३२ हिंदी नाटके केली. विष्णूदास भावे पध्दतीची नाटके १९१० सालापर्यंत या कंपनीने केली. विष्णुदास भावे यांचे निधन सांगली येथे ९ ऑगस्ट १९०१ रोजी झाले.
You cannot copy content of this page